स्नेह समृद्धी मंडळ संस्था आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे.स्रियांच्या विकासाचा विचार करताना महिलेच्या घरातील तिचा पती,मुलगा,भाऊ,दीर अशा सर्वांचा विचार करून जेंव्हा कंपनी बरोबर पुरुषांना काम देण्याची संधी मिळाली तेव्हा त्या सर्वांसाठी लाभ देण्यात आला, मात्र हि संधी संस्थेला कशी मिळाली? देवरुख परिसरातील स्थानिक कंपन्या बरोबर बोलणी करून अगदी ग्रामीण भागातील महिला – पुरुष तसेच युवक – युवती यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु केला.

1995 च्या सुमारास रत्नागिरी कलेक्टर साहेबांच्या दालनात एक मिटिंग झाली. त्याठिकाणी एक नवीन योजना सामाजिक संस्था किंवा महिला मंडळे यांच्या मार्फत महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असतील तर त्यांना प्रति व्यक्ती, प्रतिमाह व्यवस्थापन खर्च म्हणून संस्था /मंडळे यांना शासनाच्या मार्फत व्यवस्थापन खर्च म्हणून दरडोई काही रक्कम दिली जाईल असे मांडण्यात आले. महिलांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने एक वेगळा पर्याय समोर आला आणि याबाबत तातडीने विचार सुरु झाला.

त्याकाळी देवरुख येथे केवळ एकच पुण्याची “वनाझ” कंपनी चे युनिट सुरु होते. त्यांना भेटून संस्थेचे एक लेटर दिले, त्यावेळी त्यांच्याकडे लगेच मिळेल असे कुठलेच काम उपलब्ध नव्हते. त्यांचे दुसऱ्या एका संस्थेबरोबर काम सुरु होते.1999 मध्ये त्यांनी आमची विनंती मान्य केली. संस्थेने वनाझ कंपनी मध्ये 40 महिलांना ट्रेनिंग साठी निवडले. सकाळी 8 ते 4 अशी वेळ होती, खरतर गावातील महिलांना इतक्या लवकर घर सोडून शक्य असेल त्या प्रमाणे प्रवास करून साडवली येथे पोहचणे तसे आव्हानात्मक होतं पण संस्थेच्या नियोजनबद्ध कामगिरीच्या माध्यमातून हे शक्य झाले.40 महिलांनी ट्रेनींग साठी जाण्यास सुरवात केली. आता यासाठी कोणा सक्षम व्यक्तीकडे याची जबाबदारी देणे महत्वाचे होते, म्हणून आताच्या संस्थेच्या सचिव मा.सौ.सुजाता आशिष प्रभुदेसाई त्या वेळी आमच्या नुकत्याच संपर्कात आल्या होत्या, त्यांना या जबाबदारी बद्दल विचारणा करण्यात आली आणि त्यांनी तयारी दाखवून, जबाबदारी स्वीकारून एका नवीन विषयाची संस्थेने सुरवात केली.

या विषयाची जबाबदारी घेणाऱ्या सौ. सुजाता प्रभुदेसाई यांना इंजिनियरिंगचा कुठलाच बॅकग्राऊंड नसतानाही पहिल्यांदाच घेतलेल्या या कामाला अगदी उत्तम न्याय दिला. ट्रेनी महिला, कंपनी चे व्यवस्थापक, सुपरवायझर व कामगार अशा सर्व स्तरावर उत्तम मेळ राखून एक चांगली कार्यपद्धती बसवली. इथून सुरु झालेला हा प्रवास अनेक अडचणींचा सामना करीत आजही यशस्वीरित्या सुरु आहे.2000 नंतर वनाझ मधील कामाच्या अनुभवातून स्व. बाळासाहेब पित्रे यांनी एक छोटं जॉब वर्क युनिट सुरु करून दिले. या युनिट मध्ये “सुश्रुत ” या कंपनी ला हाडाचे काही नमुने मार्केटिंगच्या डेमोसाठी तयार केले जात होते हे ही काम काही वर्षे चालू होते. सौ. सुजाता प्रभुदेसाई यांच्या सततच्या असलेल्या मार्गदर्शन व देखभाल यामुळे अगदी कमी शिकलेल्या मुलींनी आपल्या कौशल्याने व चिकाटीने उत्तम काम केले,2 मुलींपासून सुरु झालेला हे युनिट अजून काही मुलींपर्यंत गेला आणि त्यांनाही संधी मिळाली व खूप उत्तम दर्जाचे उत्पादन घेतले जात होते. सुश्रुत कंपनीचे मा.श्री.फडके सर यांनी यामध्ये चांगले मार्गदर्शन केले. पुढे हे युनिट काही कारणास्तव संस्थेला बंद करावे लागले.

सन 2000 ते 2023 पर्यंत एकूण 291 कामगारांना यातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. 291 कामगारांपैकी ” महिला – 53 आणि पुरुष – 238 ” अशी संख्या होती. तसेच यांना पगार,पी.एफ आणि बोनस स्वरूपी अंदाजे ” 4 कोटी” एवढी रक्कम उपलब्ध करून देण्यात आली.

या दोन्ही अनुभवांनी युवती आणि महिलांना रोजगार उपलब्ध झालाच पण कंपनी बरोबर काम करण्याची संधी अगदी साध्या गरीब, मेहनती, कमी शिक्षण असलेल्या मुली आणि महिलांना मिळाली. यामुळे मोठा आत्मविश्वास निर्माण झाला तसेच आर्थिक पाठबळ या दोन महत्वाच्या गोष्टी त्यांना या कंपनींच्या बरोबर केलेल्या कामातून मिळाल्या आहेत याचे मूल्य खूप मोठं आहे.

या तीनही कंपन्याना मनापासून धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *