स्नेह समृद्धी मंडळ संस्था महिलांचा सर्वांगीण विकास या ध्येयाला अनुसरून काम करीत असताना मुलींना त्यांच्या भावी आयुष्यात प्रगती व त्यांचे संरक्षण व्हावे यादृष्टीने संस्था प्रयत्न करीत आहे. प्रकल्प “समर्था” अंतर्गत, संस्थेच्या कार्यक्षेत्रामधील गावांमद्धे युवतीगट स्थापन करून त्यांना कुटुंबजीवन शिक्षण, आरोग्य, क्रीडा, करिअर अशा प्रकारचे अनेक विषय घेऊन त्याद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. युवतींना त्यांच्या दैनंदिन जीवनात व भावी आयुष्यामद्धे काय करावं, योग्य काय अयोग्य काय, आपल्याला शैक्षणिक व कला कौशल्याबाबत कोणत्या संधी आहेत व त्या आपण कधी व कोणत्या पद्धतीने मिळवू शकतो, कौटुंबीक शिक्षणाचे महत्व, भावी पिढी म्हणून चांगल्या वर्तणुकीचे महत्व, ग्रामीण भागात राहूनही आपल्या शिक्षण, नोकरी व वैवाहिक आयुष्यात कशा पद्धतीने यशस्वी होता येऊ शकते याबाबत संस्थेमार्फत मार्गदर्शन करण्यात येते.
कार्यक्षेत्रातील ताम्हाणे या गावी युवतींचा गट स्थापन करण्यात आला आहे. या गटातील ठराविक ५ ते ६ मुली नेहमी बैठकांकरिता उपस्थित असतात. मात्र काही मुली बैठकीला अनुपस्थितीत का असतात याचे निरीक्षण करताना, संस्थेच्या कार्यकर्त्या व समुपदेशक सौ. सुनीता माईन मॅडम यांनी गावातील युवतींच्या मातांची बैठक घेतली आणि त्यांना युवतींकरिता संस्था गावांमद्दे बैठकांचे का आयोजन करते आहे याचा उद्देश समजावून सांगितला. महिलांनी हि माहिती ऐकून आपल्या मुलींकरीता खुप उपयुक्त असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या व आपल्या मुलींना पुढील बैठकीपासून नेहमी आपण स्वतः पाठवू असे सांगितले. आपण आणि आपल्या मुली संस्थेच्या आणि माईन मॅडम यांच्या नेहमी संपर्कामद्धे राहू असे महिलांकडून सांगण्यात आले. सौ. सुनीता माईन यांच्या मते या सर्व महिलांचा एक आधारगट आपण स्थापन करू शकतो. त्यादृष्टीने त्यांनी आपले काम सुरु केले आहे.
संस्थेचा गावांमद्धे युवक-युवतींना मार्गदर्शन करण्यासोबतच आधारगटांमार्फत गावांमधील ग्रामस्थांशी जोडून राहण्याच्या प्रयत्नांना यश येत आहे.

