समाजामध्ये युवतींना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे, त्यांनी स्वतःच्या संरक्षणाबरोबरच स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती करावी याकरीता स्नेह समृध्दी मंडळ संस्था सतत प्रयत्न करीत आहे. शासनामार्फत सुध्दा मुलींकरीता अशा प्रकारच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबावेत, त्यांनी स्वतःवर होत असलेला अन्याय, हिंसाचार याविषयी व्यक्त व्हावे आणि पुढे जावून तिच्यावर होणारे मोठे अनर्थ टळावेत यासाठी सर्व थरांवर प्रयत्न सुरु आहेत. सध्याची सामाजिक परिस्थिती आणि घडणाऱ्या भयंकर घटना बघता याकडे अत्यंत गांभीर्याने बघण्याची आता वेळ आली आहे.
संस्थेच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यामंदिर कोसुंब येथील इयत्ता ५ वी ते १० वीच्या सर्व मुला-मुलींसाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे “विद्यार्थी सुरक्षा समिती” आणि “सखी सावित्री समिती” ची स्थापना करण्यात आली. स्नेह समृध्दी मंडळ संस्था करीत असलेल्या अशाच प्रयत्नांमुळे या समितींवर सदस्य म्हणून संस्थेच्या अनुभवी आणि वरिष्ठ कार्यकर्त्या सौ. नयन शिंदे यांची नेमणुक करण्यात आली. यावेळी नयन शिंदे यांनी पोक्सो २०१२ चा कायदा, त्यामधील तरतुदी, शिक्षेचे स्वरुप इ. बाबत उदाहणांसह माहिती दिली. त्याचबरोबर शाळा समित्यांची गरज आणि महत्व याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
अशा प्रकारच्या समितींच्या सहभागातुन मुला-मुलींना मार्गदर्शन करुन त्यातुन त्यांची समज वाढवुन घडणाऱ्या वाईट घटना कमी करण्याच्या प्रयत्नांना यश येईल अशी अपेक्षा आहे.