आज समाजामध्ये अनेक सामाजिक बदल सतत घडत असताना, समाजातील मुली किंवा महिलांच्याही अनेक प्रतिमा तयार होत आहेत. मुलगी म्हणजे अशीच असली पाहिजे, तशीच असली पाहिजे या प्रतिमा बदलून मुलींनी उंच भरारी घेण्यासाठी आज मुलींसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. शासन, संस्था व सामाजिक कार्य करणाऱ्या आणि सर्व प्रकारचे ज्ञान असणाऱ्या व्यक्ती यांच्या माध्यमातुन कायदे, मार्गदर्शन, वेगवेगळ्या प्रकारची मदत समाजामध्ये उपलब्ध आहे. शिक्षणामध्ये, करिअरमध्ये महिलांना आरक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा फायदा घेऊन मुलींनी स्वतःची प्रगती करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलींचे हे महाविद्यालयीन वय अतिशय महत्वाचे आहे. पुढील करियरच्या दृष्टीने योग्य तो विचार करुन त्याप्रमाणे अभ्यास करणे, नवनवीन माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे.

देवरुख सारख्या लहान शहरामध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ ते २० वयोगटातील सुमारे ७० युवतींना याबाबतचे मार्गदर्शन करण्याची संधी दि. ०९/१२/२०२४ रोजी आठल्ये सप्रे महाविद्यालय देवरुखमधील प्राध्यापकांनी संस्थेला दिली. “मुलींच्या विविध प्रतिमा” या विषयावर मार्गदर्शन करण्यसासाठी संस्थेला महाविद्यालयामध्ये आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या प्रतिनिधी मा. नयन शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहुन अतिशय महत्वाचे मार्गदर्शन केले.

मुलींनी कौटुंबिक पातळीवर तसेच सामाजिक पातळीवर एक सक्षम महिला म्हणून आपली प्रखर प्रतिमा तयार केली पाहिजे. पंचायत राज सारख्या राजकिय क्षेत्रामध्ये महिलांना आज आरक्षण उपलब्ध आहे. त्याबाबत मुलींनी अभ्यासपूर्ण ज्ञान संपादन करुन त्यामध्येही शिरकाव करणे गरजेचे आहे. भावी सक्षम महिलेची निर्मीती ही आजच्या महाविद्यालयीन युवतीमधूनच होणार आहे. त्यासाठी आपली मानसिकता तयार करुन स्वतःला सिध्द करुन दाखविणे आवश्यक आहे. मला कोणत्या मार्गाने जायचं आहे, काय घडायचं आहे यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे याचा विचार प्रत्येक मुलीने करुन त्याप्रमाणे आपली शैक्षणिक वाटचाल करावी व आपल्या कर्तृत्वाने आपले भविष्य उज्वल करावे अशाप्रकारचे मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून मुलींना करण्यात आले.

महाविद्यालयाच्या तक्रार पेटीमध्ये मुलींच्या काही तक्रारी किंवा शंका असतील तर त्यांचे निरसन करण्यासाठी संस्थेने सहकार्य करावे असे महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून सांगण्यात आले. मुलींना योग्य ते मार्गदर्शन करणे ही संस्थेची जबाबदारी आहे संस्था नेहमीच यासाठी उत्सुक असेल असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. मुलींना या महाविद्यालयीन प्रवासात योग्य दिशा देण्याचे काम संस्थेमार्फत करण्याची संधी आठल्ये सप्रे महाविद्यालयाने संस्थेला दिली त्याबद्दल संस्था त्यांची आभारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *