स्नेह समृद्धी मंडळ संस्थेची स्थापनाच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आली. महिलांना निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होणे त्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ग्रामीण महिलांचा आर्थिक दर्जा सुधारायला हवा हा विचार करून, महिलांसाठी आर्थिक विकास या कार्यक्रमानेच संस्थेने आपल्या कार्याची सुरवात डिसेंबर 1992 मध्ये केली. कोकणातील महिलांचा विचार करीत असताना निसर्गाने भरभरून दिलेला कोकण मेवा आंबा,काजू,फणस,कोकम,करवंद इत्यादी. या नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करावा.विशेषत:ग्रामीण भागात महिलांना उपजत असलेल्या पाक-कला या त्यांच्या आवडीच्या विषयाचा विचार केला आणि संस्थेने अन्न व फळ प्रक्रियेवर आधारित व्यवसायाचा विचार करणायचे ठरविले. बिना तेलाचे कैरीचे लोणचं प्रयोग म्हणून एक वर्ष करून पाहिले, उत्तम रिझल्ट मिळाल्यावर महिलांनी आपल्या कुटुंबात जेवणात खाण्यासाठी बनवण्यास सुरवात झाली.
देवरुख परिसरातील गावा-गावात प्रथम लोणची करण्याचे प्रशिक्षण घ्यायला सुरवात झाली.यामध्ये आंबा, लिंबू, करवंद, आवळा यांचा समावेश होता. कोणत्याही महिलेला लोणचं विकत घ्यायला परवडत नाही किंवा स्वतःला जमत नाही म्हणून लोणचं खाण्याची इच्छा मारली जाऊ नये आणि दुसऱ्याकडे मागायला लागू नये ही भावना त्यामागे होती. यासाठी संस्थेने काही वर्षे सतत प्रशिक्षण दिले, सराव घेण्यात आले, असा इथून सुरु झालेला प्रवास बाजारपेठे पर्यंत महिलांनी महिलांनी तयार केलेले उत्पादने घेऊन जाण्यापर्यंत झाला. हा सुरु झालेला प्रवास खूप शिकवणारा, मनोरंजक, विविध वळण आणि भरपूर चढ उतार असलेला होता. आज या प्रवासातील एक उत्तम मार्गदर्शक आणि विक्री व्यवस्थेमध्ये असलेल्या सहकार्याला सातत्याने हात किंवा आधार देणाऱ्या एका व्यक्ती बद्दल बोलायचे आहे.
मुळच्या कोकणातल्या पण ठाणे मध्ये राहणाऱ्या तसेच कोकणच्या लोकांवर भरपूर प्रेम असणाऱ्या आणि आपल्या बरोबर इतरांना पुढे घेऊन जाण्याची इच्छा असणाऱ्या, मा.श्रीमती.अमृता बोन्द्रे मॅडम आज सलग 10-12 वर्षे दर वर्षी त्यांच्या आंब्याच्या प्रमुख व्यवसाया बरोबर कोकणतील काही खास पदार्थ त्या विक्रीसाठी ठेवतात.कोकणातील महिलांच्या हाताला काही काम मिळेल, रोजगारची संधी उपलब्ध होऊन आर्थिक मदत होईल या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेली उत्पादने म्हणजे लोणची, पीठे, मसाले आपल्या स्टॉल वर ठेवतात.आज सतत्याने 10-12 वर्षे त्यांनी आमच्या संस्थेला दिलेली ही एक उत्तम संधी आहे असे आम्ही समजतो. यांच्यामुळेच आमचे मनोबल वाढले असून उत्पादन क्षेत्रातील आत्मविश्वासही वाढला. त्यांची ही जिद्द आणि चिकाटी पाहून आमचे धैर्य वाढले. आज काही पावले पुढे जाण्यासाठी हे सर्व संस्थेसाठी खूप मोलाचे आहे. त्यांच्या या विशेष अशा सहकार्याबद्दल स्नेह समृद्धी मंडळ परिवाराकडून आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहोत.धन्यवाद!
संस्थेने ग्रामीण महिलांसाठो केलेले काही महत्वाचे प्रयत्न आपण पुढील गुरुवारी नक्की पाहूया!!

