बचतगटाच्या माध्यमातून आता सर्वत्र महिलांचा सक्रिय सहभाग दिसून येतो आहे. महिलांची आर्थिक पत वाढू लागली आहे. कुटुंबातील आर्थिक गरज, कर्ज घेऊन का होईना पूर्ण करण्याची क्षमता स्त्रियांमद्धे निर्माण झाली आहे. बचत गटामुळे तिची बचत काढणे, कर्ज व्यवहार करणे, ठरलेल्या पद्धतीने परतफेड करणे याचा सराव आज काही वर्षे सुरु आहे. त्यामुळे बचतगट त्यांना नियमितपणे कर्ज देत आहे. ज्या बँकेत त्यांच्या गटाचे खाते आहे ती बँक पण महिलांना व्यक्तिगत कर्ज देऊ लागली आहे.
आता महिलांनी उद्योगाबद्दल मात्र गांभीर्याने विचार करायलाच हवा आहे.
शाश्वत विकास या ग्रामपंचायत स्तरावर आलेल्या संकल्पनेतुन महिलांच्या पंखांना अधिक बळ देणे शक्य आहे. मात्र यासाठी महिला, त्यांचे कुटुंबीय, ग्रामस्थ व पूर्ण ग्रामपंचायत एकत्रित काम करणे महत्वाचे आहे.
महिलांना ज्या विषयातील उद्योग सुरु करायचे आहेत, म्हणजे पारंपरिक कौशल्यावर आधारित असतील, परिसरातील लोकांच्या मागणीवर आधारित असतील किंवा मुळातच सुरु असलेल्या अगदी छोट्या उद्योगांना विस्तार स्वरूप देणे असेल हे सर्व करून महिलांचे सक्षमीकरण ग्रामपंचायतीच्या स्तरावरती करता येईल. यासाठी आंबेड बुद्रुक गावाकरिता स्नेह समृद्धी संस्थेमार्फत सहकार्य करण्यात येईल असे स्नेह समृद्धी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र महिला समूहांच्या बरोबर बैठक घेण्यात येईल. ग्राम संघाच्या बरोबर व गरज वाटल्यास इच्छुक गटाबरोबर देखील बैठक घेण्यात येईल.