तिळगुळ घ्या गोडगोड बोला” या वाक्यातच एवढा गोडवा आहे की, केवळ बोलण्यानेच समोरच्या व्यक्तीला एक आपुलकीचा आनंद मिळत असतो. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक सण आपण साजरे करीत असतो. वर्षभर सर्वच सणवार अतिशय उत्साहाने साजरे केले जातात. त्यामध्ये “मकर संक्रांत” या सणाला अनन्यसाधारण महत्वा आहे. महिला अतिशय उत्साहाने यामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसून येतात. छान तयार होऊन एकमेकींकडे हळदीकुंकुला जाणे, वाण वाटणे आणि काळया रंगाची साडी नेसणे यांसारख्या परंपरा महिलांना दैनंदिन जिवनातील ताणतणाव कमी करुन आनंद देत असतात.

“महिलांचा सर्वांगिण विकास” या संस्थेच्या ध्येय्याला अनुसरुन संस्थेने अजापर्यंत महिला आणि तिचे कुटुंब नजरेसमोर ठेवुन अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन गावांमधील युवक व युवती किंवा किशोरवयीन गटातील मुलांसाठी संस्थेने सुरु केलेल्या प्रकल्पा “समर्था” अंतर्गत कार्यक्षेत्रामध्ये गावोगावी सुरु असलेल्या युवतीगट बैठकांमध्ये मुलींचा आत्माविश्वास वाढावा, मुलींनी आपल्या आयुष्याची वाटचाल योग्य दिशेने करुन आपल्या भावी आयुष्यामध्ये प्रगती करावी, त्यांनी सर्व कलागुणांमध्ये निपुण व्हावे, स्वतःचे संरक्षण स्वतः करावे यासाठी संस्थेचे काम सुरु आहे. या बैठकांमध्ये मुलींना दैनंदिन जिवनातील विविध खादयपदार्थ शिकण्यासाठी प्रोत्साहनात्मक मार्गदशन करण्यात येते. संस्था शाळांमध्येही अशाप्रकारचे प्रशिक्षण घेणे, बैठका घेणे व मुलींना विविध कौशल्यांमध्ये पारंगत करणे याकरिता सतत प्रयत्नशिल आहे. आजपर्यंत अनेक प्रशिक्षणे, बैठका आणि विविध कार्यक्रम संस्थेने किशोरवयीन मुलींकरीता घेतलेले आहेत.
कार्यक्षेत्रातील गावागावांमध्ये संस्थेने युवती गट स्थापन केले आहेतच, परंतु शाळा, महाविद्यालये यांच्याशी संपर्क करुन मुलींकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, मुलींना स्वविकास आणि स्वसंरक्षण यांबाबत योग्य ते मार्गदर्शन करणे, जेणेकरुन आजच्या बदलत्या काळामध्ये मुली आत्मानिर्भर आणि स्वावलंबी होतील. स्वतःच्या भविष्याचा गांभीर्याने विचार करुन योग्य मार्गाने पूढे जातील यादृष्टीने जेवढे शक्य असतील तेवढे प्रयत्न करणे हे सध्या संस्थेचे धेय्य आहे आणि त्यादृष्टीने संस्था सतत प्रयत्नाशिल आहे.
सध्या शाळांमध्ये विविध जाणीव जागृतीचे व कौशल्यांवर आधारित कार्यक्रम घेण्यात येतात. त्यामध्ये पदार्थ प्रशिक्षण या उपक्रमाअंतर्गत “मकर संक्रांत” निमीत्ताने कार्यक्षेत्रातील ताम्हाने हायस्कुलचे शिक्षक मा. रवी सुवारे सर यांनी मुलींना तिळगुळ बनविणे, तिळगुळाचे लाडू, तिळगुळाच्या वड्या बनविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी संस्थेशी संपर्क केला. संस्थेने कोणताच विचार न करता लगेचच या प्रशिक्षणासाठी मान्यता दर्शविली. संस्थेच्या कार्यकर्ता सौ. नयन शिंदे यांना स्वतःला पाककलेची अतिशय आवड असल्यामुळे आणि अनेक वर्षे संस्थेने कार्यक्षेत्रातील युवती, महिला यांच्यासाठी अन्न आणि फळ प्रक्रियाचे प्रशिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांनी ताम्हाने हायस्कुलच्या मुलींना तिळगुळाचे लाडू व वड्या शिकविण्याचे प्रशिक्षण घेण्याचे ठरविले.
दि. १२ जानेवारी २०२६ रोजी ताम्हाने या गावामधील हायस्कुलमध्ये २५ मुर्लीना तिळगुळ लाडू व तिळगुड वड्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पालेभाज्यांचे परोठे व बिस्कीटांचा केक या दोन पदार्थांबद्दल माहिती सांगण्यात आली. जे पदार्थ आरोगयासाठीही पौष्टीक असतात. तसेच पदार्थाचे पॅकिंग करणे, सर्व साहित्य, वेळ, मनुष्यबळ इ. चा अभ्यास करुन विक्रीसाठी अंतिम किंमत काढणे याबाबतही माहिती देण्यात आली. मुलींनी अतिशय उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला. त्यांच्या आवडीचा आणि कुतुहलाचा विषय असल्यामुळे त्यांनी उत्तम पध्दतीने तिळगुळाचे लाडू व वड्या तयार केल्या. हे करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद प्रकर्षाने जाणवत होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. चोरमाले सर व शिक्षीका सौ. पाटोळे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी या प्रशिक्षणासाठी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.
