स्नेह समृध्दी मंडळच्या जेष्ठ कार्यकर्त्या मा. सुनिता माईन” यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल विद्याभारती कोकण, मुंबई संचलित जिजाऊ शिशुवाटिका, देवरुख यांच्या मार्फत सत्कार समारंभ पार पडला, त्यानिमीत्ताने त्यांच्या सामाजिक कार्याचा थोडक्यात आढावा

स्नेह समृध्दी मंडळ संस्थेच्या जेष्ठ कार्यकर्त्या मा. सुनिता गंगाराम माईन यांचा विद्याभारती कोकण, मुंबई संचलित जिजाऊ शिशुवाटीका यांच्या मार्फत त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यांनी अतिशय उत्तम आणि योग्य कार्यकत्यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल स्नेह समृध्दी मंडळ संस्था जिजाऊ शिशुवाटीका यांचो मनःपूर्वक आभारी आहे.

सुनिता माईन यांनी सन १९९४ पासून सिध्दी ट्रस्ट, देवरुख या संस्थेच्या कार्यकर्त्या म्हणून काम करण्यास सुरुवात केली. धामापूर मध्ये संस्थेचे काम १९८०/८१ पासून सुरु होते. महिलांसाठी पोस्टाची बचत योजना त्या शाळेतील शिक्षिकेच्या पुढाकाराने सुरु झाली होती. सुमारे ३५ महिलांनी एकत्रितपणे या मध्ये सहभाग घेतला होता. या बचतीची रु.१० ने सुरुवात झाली होती. पुढे त्या शाळेतील बाईची बदली झाली आणि मग देवरुखला दर महिन्याला कसं येता येणार, कोण जबाबदारी घेणार अशी चर्चा सुरु झाली. आर्थिक मोबदला अगदि नगण्य होता. त्यामुळे कोणाला सक्ती करुन चालणार नव्हती. त्यावेळी सुनिता माईन स्वतःहून पूढे आल्या. आपल्याच वाडीतील महिलांना याचा फायदा आहे तर मी यासाठी तयार आहे असे त्या म्हणाल्या. हे व्यक्त करताना त्यांचा अविर्भाव संस्थेतील लोकांना भारावून गेला. एकूण तिचा वाडीतील पूढाकार, समज व सर्वांसाठी काहीतरी करण्याची धडपड अगदि वाखाणण्याजोगे होतो. जेव्हा गावासाठी वस्ती कार्यकर्त्यांची निवड करण्याचे ठरले तेव्हा सुनिताच यासाठी योग्य आहे यावर सर्वांचेच एकमत झाले.

सन २००३ पासून सिध्दी ट्रस्ट मधील महिला विभागाची पूर्ण टिम स्नेह समृध्दी मंडळ संस्थेमध्ये सामील झाली. ५ रु. बचतीपासून महिला मंडळ चालविले. शासकिय यंत्रणा, बँका, अशासकीय यंत्रणा यांच्याशी योग्य समन्वय साधून, पाठपुरावा करुन, लोकांना त्यांनी सहकार्य केले आहे. अनेक ठिकाणी अभ्यासदौरे मग बिहार असो किंवा शेजारच्या तालुक्यातील गावांमध्ये असो संस्थेच्या प्रतिनिधी, मार्गदर्शक म्हणून सहजतेने पण आत्मविश्वासपूर्ण त्यांचा वावर राहिला आहे.

संस्थेच्या मार्गदर्शनाखाली डवाक्रा योजना, SGSY योजनेमध्ये बचतगटांची स्थापना केली. गटाने पापड उद्योगासाठी कर्ज घेतले व प्रायोगिक तत्वावर हा व्यवसाय सुरु झाला, काही तांत्रिक कारणाने हा व्यवसाय थांबवावा लागला पण तरीही महिलांना घेवून त्या सतत कार्यरत राहिल्या. एक्सपोर्ट दर्जाचा पापड तयार करुन घेणे व धामापूर ते शिपवर पाठविण्याचे आव्हान स्विकारणाऱ्या टिममधील एक महत्वपूर्ण व्यक्ती माईन बाई आहेत.

बचत गटांचे असो किंवा कोणत्या फंडाचे असो अतिशय चोख हिशेब ठेवण्यात माईन बाईचा कोणीच हात धरणार नाही. रिझर्व बँकेच्या एका प्रतिनिधी असलेल्या टिमने याबाबत त्यांचा अनुभव घेतला आणि अगदि अल्प शिक्षण असूनही मागील ५ वर्षाचा हिशोबाची तोंडी मांडणी ऐकून अधिकारीही थक्क झाले होते.

पंचायत राज मध्ये आपली जबाबदारी व मर्यादा समजून घेऊन ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. वाडीतील महिलांनी सतत पुढे यावे, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा त्याचबरोबर महिलांवर होणाऱ्या अन्यायावर सुध्दा सर्व सखीबरोबर न्याय द्यावा, त्यांच्या समस्या सोडवाव्यात यासाठी त्यांचे १९९४ ते आजपर्यंत काम सुरु आहे.

संस्थेमध्ये तालुकास्तरीय फेडरेशनच्या त्या अध्यक्षा असून कायदेविषयक प्रशिक्षित समुपदेशकही आहेत. पूणे येथील लॉ कॉलेजने सुरु केलेल्या स्पेशल समुपदेशक प्रशिक्षणामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे. माईन बाईच्या समुपदेशन पध्दतीचा व्हिडिओ, प्राशिक्षण साहित्य म्हणून इतर संस्थासाठी उपयोगात आणण्यात आला. दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करुन उत्तम यश त्यांनी संपादन केले.

बदलत्या कालखंडाप्रमाणे महिलांनाही पूढे नेण्याकरिता येणाऱ्या नवीन नवीन योजनामध्ये, प्रशिक्षणांमध्ये सहभागी करुन त्यांना रोजगार मिळण्यासाठी त्या सतत सक्रीय असतात. त्यांची प्रेरणा घेवून महिलाही आज कार्यक्रमांसाठी, रोजगारासाठी, घराबाहेर पडल्या आहेत. कुटुंबातून एकही दिवस बाहेर न राहणाऱ्या महिला आज चार ते आठ दिवससुध्दा प्रशिक्षणाकरिता, रोजगाराकरिता बाहेर पडू लागल्या आहेत. या सर्व महिलांना माईनबाई या एक आधारस्तंभच वाटत आला आहे.

आधारगट व महिलांच्या कौटुंबिक समस्यांवर काम सुरु असताना परिसरातील १३ ते २१ वयोगटातील मुलीबरोबर काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे संघटन करणे, त्यांच्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, मार्गदर्शनपर मासिक बैठका, कौशल्य जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात मुली व पालक यांच्यातील संवाद साधला जात आहे. मुलींना चांगल्या वाईटाची जाण येत आहे.

सोबत असणाऱ्या महिला असो, विद्यार्थी असो, घटक कोणताही असो त्या घटकाला योग्य दिशेने व पध्दतीने बरोबर घेऊन जाण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे आलेली जबाबदारी समजून घेऊन ती यशस्वी करण्याची हातोटी, आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविणे हि भूमिका त्यांचे सर्व काम यशस्वी करण्याचे कारण असावं. आजपर्यंत सुरु झालेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, उपक्रमामध्ये सुनिता माईन यांनी त्यांची निवड किती योग्य होती हे सिध्द केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *