संगमेश्वर तालुक्यातील महिलांना अन्न व फळ प्रक्रियेवर आधारित व्यवसायावर स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार करून स्नेह समृद्धी मंडळाने सातत्याने अनेक वर्ष प्रयत्न सुरू ठेवले.लोणची व विविध पदार्थांचे प्रशिक्षणां बरोबर केटरिंग सेवा या व्यवसावर लक्ष केंद्रित कराव असे संस्थेने ठरवले. देवरुख या गावाचा तेव्हा विचार करून भविष्यात हे एक शहर म्हणून नावारूपाला येईल, हा विचार करून केटरिंग सेवा व्यवसाय, महिला समूहांना कसा फलदायी ठरेल या बाबत विचार सुरू होते, त्या दृष्टीने पोळी भाजी,आमटी भात, या मध्ये वैविध्य कसे आणता येईल, चटण्या,कोशिंबीर या मध्ये काय बनवू शकतो या बाबत पण सतत चर्चा करून प्रथम TOT मोड्युल तयार केलं. काही निवडक महिला तयार झाल्या, या मध्ये कार्यकर्त्या,महिला समूह प्रमुख यांचा समावेश होता.अपेक्षे प्रमाणे देवरुख मध्ये नोकरदार वर्ग,कौटुंबिक कार्यक्रम,लग्न समारंभ, शैक्षणिक सुविधांमुळे वाढता विदयार्थी वर्ग अशा अनेक गोष्टींमुळे केटरिंग सेवा व्यवसायाला संधी मिळाली.
या विषयामध्ये विशेष जबाबदारी संस्थेच्या उपाध्यक्षा मा.सौ.शैलजा कांगणे यांनी स्विकारली.देवरुख मधील कांगणे वाडीतील महिलांना संस्थेच्या माध्यमातून एकत्र करून माहिती देणे, प्रशिक्षण देणे सुरू केले, सुवर्ण जयंती स्वरोजगार योजनेतून अर्थ सहाय्य घेऊन केटरिंग सेवा सुरू केली. संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या ऑर्डर पूर्ण करण्याची सुरुवात केली. पुढे कांगणे मॅडम मागे वळून पहिले नाही,यांनी खूप मेहनत या विषयात घेतली व आजही घेत आहेत.संस्थेच्या अध्यक्षा सौ.श्रद्धा देशपांडे यांच्या प्रयत्नाने आज पंचायत समिती आवारात एक खानपान सेवा केंद्र 2006 पासून कार्यरत आहे,शासनाच्या मार्फत त्यांना विक्रीसाठी बांधलेल्या संकूलात गाळे उपलब्ध झाले,अतिशय उत्तम प्रकारे अंजनी महिला समूहाच्या महिला ते केंद्र आजही चालवत आहेत. विशेष म्हणजे “राजमाता जिजाऊ स्वावलंबन”,हा कोकण विभागाचा उत्तम गट म्हूणन अंजनी गटाला व त्यानां मार्गदर्शन केल्या बद्धल स्नेह समृद्धी मंडळ संस्थेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पुढे जाऊन याच वाडीतील स्त्री सखी महिला समूहाने देखील खूप कष्ट घेतले. संस्थेने उद्योगासाठी प्रत्येक प्रयोग सौ.कांगणे मॅडम यांच्या सहकार्याने याच गटाबरोबर केले.अंगणवाडी पोषण आहारा मध्ये ही प्रयत्न झाले. सुरुवातीला फेडरेशन मार्फत पूर्ण तालुक्याची जबाबदारी घेता येईल का असा प्रयत्न झाला, स्थानिक गटांना प्राधान्य दिले,काही गटांनी तसे प्रयत्न देखील केले,परंतु धोरणात्मक पातळी वरती काही विषयात स्पष्टता नव्हती, त्यामूळे हे सर्व गावांमध्ये घडू शकलं नाही. परंतु काही गटांनी हे काम घेतलं. स्त्री सखी ला देवरुख हायस्कूल व सर्व मराठी शाळांचे काम मिळाले,त्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने ते काही वर्षे चालवीले.पुढे काही शाळांची धोरणे बदलली, काही शासन पातळी वरती धोरणे बदलली, त्यामूळे महिलांना शक्य असताना व त्यांची तयारी असतानाही पुढे चालवीता आले नाही. केटरिंग सेवे मध्ये देवरुख परिसरातील महिलांनी खूप उत्तम कामगिरी केली,आज या क्षेत्रात नाव व पैसा मिळवू लागल्या आहेत.मुख्य म्हणजे आपल्या सुना या क्षेत्रात याव्यात व यशस्वी व्हाव्यात हा हेतू आमच्या सर्व जेष्ठ सभासदांनी दाखविला आहे,म्हणून याची देही याची डोळा’ पुढची पिढी या व्यवसायात पदार्पण करताना दिसतेय.
हे सर्व शक्य झालं कारण त्या मध्ये अनेकांचा हातभार आहे, स्वतः महिला, कुटुंबीय, संस्थेची सर्व टीम,शासकीय अधिकारी व कर्मचारी या सर्वांचा मोलाचा वाटा आहेच परंतु या मध्ये मा.सौ.शैलजा कांगणे मॅडम यांचा सिंव्हाचा वाटा आहे.असे कोणीतरी बरोबर असल्या शिवाय एव्हढे यश नाही मिळू शकत.
धन्यवाद मा.सौ.शैलजा कांगणे बाई .

