स्नेह समृद्धी मंडळ, देवरुख व परिवर्तन ८४ मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प समर्था अंतर्गत युवतींकरिता दि. १३/०८/२०२३ रोजी करिअरविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी स्मिथ ऍण्ड नेफ्यु कंपनीचे मॅनेजर, इंजिनिअरिंग क्षेत्रात मागची २८ वर्षे काम करीत असलेले, संगीत क्षेत्रात ज्यांचे मोठे योगदान आहे असे संस्थेचे सल्लागार मा.श्री.आशिष प्रभुदेसाई व कृषी पदवीधर, सामाजिक संस्थानमद्धे २५ वर्षे कार्याचा अनुभव असणारे, उत्तम शिक्षक म्हणून बोन्द्रे क्लासेस मद्धे प्रसिद्ध असणारे, ज्यांचा कृषितज्ञ म्हणून जिल्ह्यात नावलौकिक आहे आणि जे संस्थेचे सल्लागारही आहेत असे श्री.सदानंद बोन्द्रे हे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून लाभले.
संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ८० युवतींनी या प्रशिक्षण कार्यक्रमामद्धे सहभाग घेतला. मा. आशिष प्रभुदेसाई यांनी, युवतींना जॉबसाठी मुलाखतीला जाताना आपण कोणती तयारी करणे आवश्यक आहे? जॉबची निवड करताना कशाप्रकारे करावी? आपल्याकडे कोण कोणती कागदपत्र असणे आवश्यक आहे? याचे प्रेसेंटेशन द्वारे अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची आम्हाला अत्यंत आवश्यकता असल्याचे मत उपस्थित युवतींनी व्यक्त केले.
मा.सदानंद बोन्द्रे यांनी युवतींना आपण संगमेश्वर तालुक्यामद्धे कोकणासारख्या भौगोलिक ठिकाणी रहातो आहोत त्या ठिकाणी कोणकोणते व्यवसाय करून चांगल्या प्रकारे आर्थिक मोबदला मिळवू शकतो याचे खूप चांगले मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व युवतींनी संघटित होऊन एक मंडळ किंवा गट स्थापन करावा जेणेकरून तुम्ही एकत्रितपणे चर्चा करून काही ना काही व्यवसाय करू शकता. याचा खुप चांगला उपयोग तुमच्या आयुष्यात होईल असे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा मा.श्रद्धा देशपांडे यांनी उपस्थित युवतींना मार्गदर्शन केले. मुलींनी संस्थेशी जोडलेले रहावे आणि युवतींसोबत घेत असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा पाठपुरावा व्हावा याकरीता संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी स्थानिक पातळीवर शाळा व शाळाबाह्य मुलींना सोबत घेऊन गट करावे व या गटांकरीता संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करेल. यामद्धे स्व-संरक्षण, विविध कौशल्ये, चर्चासत्रे, लहान प्रकल्प अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचा समावेश असेल. मुलींनी आपल्या आवडीचे विषय निवडून यामद्धे सहभागी व्हावे. त्याची सुरुवात म्हणून आपण एक सर्वांचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. स्थानिक पातळीवरील कि-पर्सन, संस्थेचे कार्यकर्ते, पालक, शिक्षक, आशाताई, अंगणवाडी सेविका, तुमच्या आणि संस्थेच्या मधला एक सुरक्षित दुवा म्हणून कार्यरत असणार आहेत. तुम्ही सुरक्षित राहून आयुष्याच्या योग्य दिशेने वाटचाल करीत असताना या सर्व संधीचा तुम्ही उपयोग करून तुमचे आयुष्य सुखकर करावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. शैलजा कांगणे, सचिव सौ.सुजाता प्रभुदेसाई, व्यवस्थापक श्री.अनिल कुडाळकर व सहयोग महिला फेडरेशनच्या अध्यक्षा आणि समुपदेशक सौ. सुनीता माईन यांनी उपस्थित युवतींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी सौ. नयन शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या सर्व युवती, मार्गदर्शक, संस्थेचे कार्यकर्ते आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केलेल्या सर्व व्यक्तींचे सौ. नयन शिंदे यांनी आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


