स्नेह समृद्धी मंडळ या संस्थेची स्थापनाच महिला विकास, महिला सबलीकरण या हेतूने करण्यात आली. त्यामुळे सर्व प्रकारे, सर्व बाजुंनी स्त्रियांची प्रगती कशी होईल हाच विचार संस्थेच्या अध्यक्षा या नात्याने मा. श्रद्धा देशपांडे मॅडम यांच्या मनात सतत असतो. संस्थेचे संचालक मंडळ, सहकारी, कार्यकर्ते व कार्यक्षेत्रातील महिला प्रतिनिधी, ग्रामस्थ बंधू-भगिनी अशी आमची सर्वच मंडळी नेहमीच बरोबर असतात. १९९३ मद्धे जरी ट्रस्ट ऍक्ट अंतर्गत संस्थेची नोंदणी झाली असली तरी त्या आधीपासूनच महिलांच्या बरोबर कार्य सुरु झालं होतं. संवाद कशाप्रकारे ठेवावा, कोणते पर्याय त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अगदी स्थानिक पातळीवर उपलब्ध आहेत असे सर्व लक्षात घेऊन साधारण १९९० पासूनच काही प्रक्रिया सुरु झाल्या होत्या.

संस्थेला शासनाच्या सहकार्याने काही उपक्रम सुरु करता आले. ज्यामद्धे महिलांना आर्थिक स्रोत उपलब्ध झाले. यासाठी आर्थिक मुख्य प्रवाह आहे तो म्हणजे पत पुरवठा करणाऱ्या बँका यांच्याशी महिलांचे समूह, बचतगट जोडण्यात आले आणि एक महत्वाचा मार्ग महिलांना मोकळा झाला. आता स्वतःची प्रगती किती आणि कशी करून घ्यावी हे त्यांनी स्वतः ठरविले पाहिजे. जेवढी पाहिजे तेवढी प्रगती त्या करून घेऊ शकतात. यामद्धे संस्थेची कामगिरी खूप योग्य दिशेने ठरली याचं खुप समाधान आम्हाला आहे. माहिती आहे कि अजून अनेक टप्पे महिलांना पार करायचे आहेत. पण आज त्यांच्या सोबत शासनाच्या यंत्रणाही आहेत हि अधिक जमेची बाजू आहे.

संस्था याच्या पुढील टप्प्यासाठी जेव्हा विचार करते तेव्हा असं लक्षात येतं कि आता अधिक विचारपूर्वक नियोजन असायला हवं. पण कदाचित संस्थेची पुढील भूमिका एक मार्गदर्शक, दिशा दर्शक अशी राहील. राष्ट्रीय पातळीवर स्वीकृती असावी, जाण्याची संधी असावी आणि यासाठी महिलांनी स्वतः प्रयत्न करावेत. त्यासाठी संस्था काही प्रयत्न करते आहेच. जसं काही दिवसांपूर्वी जिल्हा स्तरावरती महिलांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व यांचा त्रिवेणी संगम असणारी भारतीय संस्कार आणि संस्कृतीची परंपरा जपणारी, स्व-विकास आणि समाज विकास करण्यासाठी योगदान देणारी, मातृशक्तीच्या तेजस्वी अनुभूतीचा अविष्कार संपन्न करून सशक्त भारत निर्माण करण्यासाठी हे एकदिवसीय “तेजस्विनी महिला संमेलन” आयोजित करण्यात आले होते.

संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ३० महिलांनी या संमेलनामद्धे लावलेली हजेरी, नक्की काय चाललं आहे आपल्या परिघाबाहेर, वैचारिक स्तरावर काय चालू आहे, बचत, कर्ज, आर्थिक व्यवहार याच्याबरोबर अजून कोणते अवकाश आपल्यासाठी मोकळे आहे याबाबत एक तोंडओळख करून देणे हा एक हेतू या कार्यक्रमात आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांना सहभागी करून देण्यामागे संस्थेच्या मनात नक्कीच होता.

भारताच्या विकासात महिलांचे योगदान, भारतीय चिंतनात महिलांचा विचार, कर्तृत्ववान महिलांचे सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदीकुंकू व दैनंदिन सोयींबाबत चर्चासत्र आणि प्रश्नमांडणी यामद्धे आरोग्य, शिक्षण व स्वच्छता या विषयांचा व सकारात्मक विचारांचा या कार्यक्रमामद्धे प्रामुख्याने समावेश होता. रत्नागिरी मधील हा कार्यक्रम खुप परिणामकारक झाला . ज्यामद्धे आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांनी सहभाग घेतला हि संस्थेसाठी सकारात्मकतेचे समाधान देणारी बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *