आधारगट हे पीडित महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्वाची जबाबदारी घेऊ शकतात याबाबत संस्थेने हिंसाचार विरोधी कायदा २००५ च्या जनजागृती करीता उत्तम मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले. प्रकल्प संपल्यावर देखील आधारगट कार्यरत ठेवण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहिली. संस्थेच्या समुपदेशक व जेष्ठ कार्यकर्त्या सुनीता ताई या आधारगटाच्या नेहमी संपर्कात असतात. आधारगट तयार करताना त्या गावातील किंवा परिसरातील बचत गटाच्या सदस्यांचे प्रतिनिधित्व असते. म्हणजे गावातील कोणत्याही भागातील स्त्रीला सपोर्ट करता येईल अशी व्यवस्था आहे.
मानसकोंड या गावामद्धे दि. १५/१२/२०२३ रोजी आधार गटाची बैठक संपन्न झाली. संस्थेचे शासन मान्य समुपदेशन केंद्र आहे. या केंद्राच्या माध्यमातून सामंज्यस्याने कौटुंबिक समस्या सोडवणे, आरोग्य, कायदा, कौटुंबिक सुरक्षा, आत्मनिर्भरता अशासाठी सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येते. अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. गावातील प्रमुख व्यक्ती, सरपंच, पोलीस पाटील, वाडीप्रमुख, जेष्ठ कार्यकर्ते व निवृत्त कर्मचारी अशा लोकांना बरोबर घेऊन वाटचाल करणे अपेक्षित आहे. संस्थेचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होऊन भविष्यात मुली, स्त्रिया यांना एक खंबीर आधार स्तंभ होईल अशी आशा आहे.


