मानसकोंड या गावातील महिलांनी “जागतिक महिला दिन” साजरा केला. १९९४ पासून या गावात महिला एकत्र येऊ लागल्या. त्यावेळी शासनाच्या आलेल्या ग्रामीण भागातील महिला व बालकांसाठीच्या विशेष योजनेपासून महिलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून विकासाची दिशा देण्यात आलेली आहे. आणि यामद्धे सर्वात महत्वाची भूमिका त्या ठिकाणच्या रहिवासी सुचिता मादुस्कर यांनी निभावली आहे.
सामाजिक संस्थेचे मार्गदर्शन घेऊन आपण या महिलांना सक्षमीकरणाच्या दिशेने घेऊन जावं हि आस धरून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यावेळचे ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक वर्ग, वाडीप्रमुख यांनी चांगलं सहकार्य दिलं. त्यांनतर आलेल्या DWCRA, बचतगट, उद्योगाचे प्रयत्न, कर्ज देवघेव करणे, आधारगटाच्या मदतीने कौटुंबिक प्रश्न सोडविणे, स्नेह समृद्धी मंडळ या संस्थेमार्फत आलेले सर्व कार्यक्रम खुप मनापासून राबविले. तसेच युवती विकासाचा पण उत्तम प्रयत्न केला. महाराष्ट्र जीवनोत्ती कार्यक्रमात देखील सर्व गट सहभागी झाले. आज त्यांच्यामार्फत म्हणजेच शासनाच्या बरोबर या महिला उत्साहाने सहभागी होत आहेत.
दिनांक ८ रोजी मानसकोंड या गावी महिला मेळावा संपन्न झाला. ८६ महिला यावेळी उपस्थित होत्या. संस्थेच्या समुपदेशक सौ. सुनीता माईन या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. ज्या महिलांनी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली महिला संघटनेला सुरुवात केली. विविध कार्यक्रम राबविले आणि पुढील पिढीतील महिलांनी, मुलींनी हाच वारसा पुढे चालवावा म्हणून सतत प्रोत्साहन देत आहेत, अशा जेष्ठ महिलांचे यावेळी सत्कार करण्यात आले.
संस्थेच्या समुपदेशक सुनीता माईन यांनी आपल्या मार्गदर्शनामद्धे महिलांच्या आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल प्रथम आभार मानले आणि अशा प्रकारचा महिलांचा उत्साह वाढावा, त्यांचे संघटन टिकावे, त्यांना काही अडचणी आल्या तर या एकीची ताकद दाखवून सामोरे कसे जावे याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याबाबत माहिती देऊन त्याकरिता संस्थेने राबविलेली आधारगट हि संकल्पना कशी सक्षम होईल याबाबत मार्गदर्शन केले.

