स्नेह समृध्दी मंडळ संस्थेमध्ये काम करणारे कार्यकर्ते हे संस्थेचे नेहमीच कौटुंबिक सदस्य राहीले आहेत. संस्थेसोबत काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता स्वतःला नशिबवान समजतो की आपल्याला स्नेह समृध्दी मंडळ सोबत काम करण्याची संधी मिळाली. संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रध्दा देशपांडे मॅडम व संस्थापक मा. रामचंद्र देशपांडे सर यांनी आपल्यासोबत काम करणाऱ्या कार्यकत्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वागणूक दिली. आईवडिल जे जे आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी करतात. मुलांचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, योग्य मार्गदर्शन करणे, वेळप्रसंगी कठोर भूमिका घेऊन योग्य अयोग्याची जाणीव करुन देणे अशा त्यांच्या भुमिकेमुळे संस्थेतील कार्यकर्ते असोत, स्वयंसेवक असोत की कार्यक्षेत्रातील कोणीही व्यक्ती असो देशपांडे सर आणि मॅडम नेहमीच त्यांना आपले हक्काचे वाटत आले आहेत. गावातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही समस्येवर त्यांच्याशी अगदी मनमाकळेपणाने बोलू शकते.

सिध्दी ट्रस्ट देवरुख या संस्थेमधून सामाजिक कार्य सुरु झाले होते. सन २००३ पासून सिध्दी ट्रस्ट मधील महिला विभागाची पूर्ण टिम स्नेह समृध्दी मंडळ संस्थेमध्ये सामील झाली. त्याच्या आधिपासून देशपांडे पती-पत्नीना मानणारे कार्यकर्ते हे आजपर्यंत त्यांच्यासोबत आहेत. त्यामधील महत्वाची व्यक्ती म्हणजे स्नेह समृध्दी मंडळाचे व्यवस्थापक मा. श्री. अनिल कुडाळकर. कुडाळकर सरांनी आपलं सर्वस्व संस्थेला देवून मा. देशपांडे सर व मॅडम यांच्यासोबत खंबीर उभे राहून संस्थेला नावारुपाला आणली. अतिशय उत्तम व्यवस्थापकीय गुण असलेले शिस्तप्रिय व्यक्तीमत्व घडविण्याचे संपूर्ण श्रेय्य श्री. कुडाळकर मा. देशपांडे सर आणि मॅडम यांना देतात. “लोखंडाला परिसस्पर्श होऊन त्याचे सोने व्हावे” तसे श्री. कुडाळकर यांचे व्यक्तीमत्व संस्थेमध्ये राहून घडत गेले आणि आज समाजातील अनेक व्यक्तीसाठी श्री. कुडाळकर हे एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून उभे राहिले.

सुनिता माईन यांच्यासारख्या गावातील एका वाडीत रहाणारी सर्वसामान्य महिला उत्तम प्रकारे समुपदेशन करु शकते आणि पूणे लॉ कॉलेजमध्ये आदर्श समुपदेशक म्हणून गणली जाते यातच सर्व सार सामावलेलं आहे. संस्थेतील प्रत्येक कार्यकर्त्याचा एखादा गुण हेरुन, त्यावर काम करुन, त्याला प्रोत्साहन देवून त्यानुसार त्या व्यक्तीकडून काम करुन घेण्याची हातोटी मा. देशपांडे मॅडम यांची आहे. त्यामुळेच संस्थेचा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय आत्मविश्वासपूर्ण काम करुन नेहमीच स्वतःची चुणूक दाखवत असतो.
संस्थेच्या अध्यक्षा मा.श्रध्दा देशपांडे मॅडम व व्यवस्थापक श्री. अनिल कुडाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या कार्यालयामध्ये सर्व कार्यकत्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक मा.श्री. रामचंद्र देशपांडे सर, सचिव मा. सुजाता प्रभुदेसाई, संस्थेच्या हितचिंतक, मार्गदर्शक आणि स्वयंसेवक मा. गौरीताई देशपांडे व सर्व कार्यकर्ते आणि स्वयंसेवक, हितचिंतक उपस्थित होते.

उपस्थित सर्वानी मा.देशपांडे मॅडम व श्री. कुडाळकर सर यांना भरभरुन शुभेच्छा दिल्या व आपापल्या आठवणींना उजाळा देत असताना प्रत्येकजण भावूक झाला. संस्थापक मा. देशपांडे सर यांनीही जुन्या आठवणीना उजाळा देत श्री. कुडाळकर सर यांच्यातील गुणांचे कौतुक केले. सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन सर्वांना उत्तम कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


आपल्यावर झालेल्या चांगल्या संस्कारांना उत्तम विचारांची जोड मिळाली की, अशक्य गोष्टीही आपण नक्कीच साध्य करु शकतो. “कोणत्याही परिस्थितीत हार न मानता स्वतः वर विश्वास ठेवुन अविरत प्रयत्न करणे हे यशाचे खरे गमक आहे” असे मत श्री. कुडाळकर सर यांनी मांडले. सर्व कार्यकत्यांनी संयम ठेवून अशा पध्दतीने वागले तर आपले भविष्य उज्वलच असणार आहे असे मार्गदर्शन त्यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार मानले व अल्पोपहार आणि चहापान करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *